लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शक्तिशाली मूल्यांपैकी एक असलेली निष्ठा ही श्रद्धेपेक्षा वेगळी व सूक्ष्म आहे. श्रद्धेला नकळत भाव जोडलेला असल्यामुळे ती भक्तीशी जोडते; मात्र निष्ठा विवेकपूर्ण समर्पित भक्तीला जोडणारी आहे, म्हणून निष्ठेतून अंधनिष्ठा जन्माला येत नाही, असे प्रतिपादन मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक यांनी केले.भाजपाचे ज्येष्ठ नेते बंडोपंत जोशी यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय विचार प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘भक्तीयुक्त निष्ठा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात पाठक प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बीजाला सांभाळणारी माणसं जी असतात ती खरी निष्ठावान म्हणून ओळखली जातात. प्रत्येक अभिनंदनीय गोष्ट ही अनुकरणीय असतेच असे अजिबात नाही. श्रद्धा हे मूल्य भक्तीशी जोडणारे आहे, त्यामुळे त्यामधून अंधश्रद्धा जन्माला येते; मात्र निष्ठा विवेकपूर्ण समर्पित भक्तीला जोडते. निष्ठा हा पैलू विवेक पूर्ण आणि समर्पित या दोन अंगांनी तपासला पाहिजे. निष्ठा अनुकरणीय, सदैव जागवणारी, पेलणारी आणि पेरणारी असते. त्यामुळे निष्ठा या मूल्याची ताकद समजून घेण्याची गरज आहे. निष्ठेचा प्रवास अत्यंत सूक्ष्म असतो. सुरुवातीला ती दुर्लक्षित राहते, नंतर टीकेची धनी होते. त्यानंतर कुंपणावरून का होईना लोकांकडून तिच्यावर प्रहार केला जातो. कालांतराने निष्ठेचे कौतुक होऊ लागते आणि ती गौरवाच्या स्थानावर एक दिवस पोहचलेली असते. जो समाज टीका करतो, त्याच्याकडूनच मग निष्ठेचा गौरव होत असतो. त्यामुळे हे मूल्य सत्यासारखे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर, सभागृहनेता दिनकर पाटील, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, नाना शिलेदार, योगेश हिरे, नगरसेवक हिमगौरी अहेर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक देवदत्त जोशी यांनी केले.
निष्ठेतून अंधनिष्ठा जन्म घेत नाही
By admin | Updated: July 5, 2017 01:04 IST