नाशिक : संमेलनात विज्ञान लेखकांचा परिसंवाद व्हावा, नाशिकशी निगडित साहित्यिकांचे चरित्र सादर व्हावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव व्यासपीठाला द्यावे, संमेलनाच्या स्मरणिकेचे काम आतापासूनच हाती घ्यावे, संमेलनाच्या फलश्रुतीचा विचार व्हावा, संमेलनातून वैज्ञानिक पुराेगामित्वाचे विचार पुढे यावेत, अशा अर्थपूर्ण सूचनांसह संमेलनात येणाऱ्यांच्या पर्यटनाची व्यवस्था करावी, ज्येष्ठ नागरिकांना संमेलनात स्थान द्यावे, युवा कवींना वेगळ्या कवीसंमेलनाची संधी द्यावी, कामगारांचा परिसंवाद घ्यावा, अशा सूचनांपर्यंत अनेकोनेक सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आयोजकांवर सूचनांचा वर्षाव झाला. अडीच दिवसांच्या संमेलनासाठी सर्वच सूचनांचा विचार करता येणे शक्य नाही, संमेलनात कोणते विषय घ्यायचे, त्याचा निर्णय महामंडळाचा आणि आयोजक संस्थेचा असल्याचे सांगून अन्यथा नाशिकसाठी भविष्यात स्वतंत्र संमेलन भरवू, असे सांगून स्वागताध्यक्षांनी सर्वच सूचनांचे स्वागत केले.
गोएसो कॅम्पसमध्ये झालेल्या या बैठकीस विविध सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तसेच साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्ञानेश सोनार यांनी व्यंगचित्रकारांसाठी परिसंवाद, तसेच प्रात्यक्षिकांची व्यवस्था करण्याची सूचना केली, तर संतोष हुदलीकरांनी लोककला आणि परंपरांचा जागर करावा, वसंत खैरनार यांनी वैज्ञानिकांचा परिसंवाद व्हावा, कुसुमाग्रज नगरीसह अन्य प्रवेशव्दारांना साहित्यिकांचे नाव द्यावे, या सूचना केल्या. श्रीकांत बेणी यांनी प्रवेशद्वारांना संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्या.रानडे यांच्यासह बाबुराव बागुल, वामनराव कर्डक, गजाभाऊ बेणी यांचे नाव देण्याची मागणी केली. प्रमोद पुराणिक यांनी नाशिकमध्ये शिक्षण झालेल्या लेखिका सानिया यांना निमंत्रण देण्यासह राज्याबाहेरील साहित्य मंडळांनाही निमंत्रणे देण्याची सूचना केली. सचिन शिंदे यांनी २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनी नाटकांबाबत परिसंवाद व्हावा, तसेच नाशिकच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी संमेलनाच्या फलश्रुतीचा विचार व्हावा आणि नव्या पिढीला, नाशिकला संमेलनातून काय मिळेल, त्याचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ.प्रतिभा जाधव यांनी संमेलनात महिलांचा सहभाग वाढवून ते सर्वसमावेशक करावे, असे नमूद केले. स्वप्निल तोरणे यांनी आरोग्यविषयक परिसंवाद भरवावा असे, तर उदय रत्नपारखी यांनी शंभरहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या ग्रंथालयांचा सत्कार करण्याची सूचना केली. दत्ता पाटील यांनी कर्मकांडाला फाटा देऊन पुरोगामित्वाची, वैज्ञानिक दृष्टी देणारे संमेलन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा.वेदश्री थिगळे यांनी स्मरणिकेची रूपरेषा निश्चित करून आतापासूनच कामाचे नियोजन केले जावे, अशी सूचना केली. विनायक रानडे यांनी ब्लॉग लेखकांचा समावेश करावा, अशी तर संजय चौधरी यांनी संमेलन कोणत्याही रुसव्या-फुगव्यांविना पार पाडले जावे, अशी सूचना केली. त्याशिवाय अन्यही सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकात लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी संमेलनाची रूपरेषा सांगून सूचना, सल्ले देण्याची विनंती केली. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, गोएसोचे सचिव डॉ.मो.स. गोसावी सर, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार हिरामण खोसकर, लेखक चंद्रकांत महामिने, शाहू खैरे, लक्ष्मण सावजी, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, समीर भुजबळ, रंजन ठाकरे, अण्णा झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
पुरस्कारांची संख्या वाढवावी
राज्य शासनाच्या वतीने १९६० सालापासून दरवर्षी ७४ साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये शासनाने घट करून ती संख्या ३४ वर आणली असून, त्यात वाढ करून ती संख्या १०० पार नेण्याची स्वागताध्यक्षांना विनंती केली. गत साठ वर्षांत ग्रामीण भागात लिहिणाऱ्या लेखकांची संख्या खूप वाढली असल्याने, पुरस्कारांच्या संख्येत वाढ करण्याचा ठरावही संमेलनात करण्यात यावा, असेही यावेळी सांगितले.
इन्फो
संमेलनासाठी जाहीर दान
संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी शहरातील सर्व लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये निवासाची मोफत व्यवस्था करण्यासह संघटनेच्या वतीने ३१ हजार रुपयांची मदत संमेलनाला करणार असल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांनी वाहनांच्या पार्किंग जागेच्या जबाबदारीसह कुटुंबाच्या वतीने ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. रमेश देशमुख यांनी कुटुंबाकडून ५ हजार तर संस्कृत सभेकडून २ हजार रुपयांची देणगी दिली.