नाशिकरोड : शिंदेगाव येथील नायगाव रोडवर असलेल्या एका दारू दुकानाच्या गुदामावर सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधून हल्लेखोरांनी सुमारे कग लाखांचा दारूसाठा आयशर ट्रकमधून लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंधर्वनगरी येथे राहणारे राजस्थान लिकर कंपनीचे व्यवस्थापक दीपक दत्तात्रय नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नायगाव रोडवरील लोहिया कंपाउण्डमध्ये राजस्थान लिकर कंपनीचे गोडाऊन आहे. शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास तिघांनी येथे येऊन तोंडाला कपडा बांधून सुरक्षारक्षक मयूर शांताराम मगर याच्या खोलीत गेले. दारूचे गोडाऊन कोठे आहे, असे विचारले. त्याने माहिती नसल्याचे सांगितल्यावर तिघांनी त्याला मारहाण करून खोलीतील चादर फाडून मगर याचे हात बांधले. त्याच्या खिशातील मोबाइल व कंपाउण्ड गेटची किल्ली हिसकावून घेत गुदामाचे शटरचे कुलूप तोडून रॉयल स्टॅग या विदेशी दारूचे २६ लाख ९४ हजार २०३ रुपयांचे विविध आकाराचे ३७० बॉक्स आयशर गाडीत टाकून पलायन केले. मगर याने स्वतःची सुटका करून घेऊन मालकाला ही घटना सांगितली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, गणेश न्याहदे, विलास शेळके यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.