नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला गोविंदनगर-कर्मयोगी नगर-उंटवाडी पूल रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्यामुळे या रस्त्यावर दिवसागणिक अपघातात वाढ होत असून, कच्च्या रस्त्यामुळे वाहनचालकांना नाका-तोंडात व डोळ्यात धूळ घेतच मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे अतिशय वर्दळीच्या असलेल्या या रस्त्याच्या नादुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, सिडको व सातपूरवासीयांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेला गोविंदनगर रस्ता महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी खुला केला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे सिटी सेंटर मॉलनजीक वाहतूक नियंत्रणासाठी आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, परंतु या रस्त्याच्या अगदीच तोंडाशी जवळपास दोनशे मीटरचा रस्ता कच्चा सोडला असून, त्याठिकाणी खड्डे पडून, खडी तसेच माती पसरल्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच पसरलेल्या खडी, मातीने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत.
सिंहस्थ संपला, कामे अर्धवट सोडली
By admin | Updated: November 14, 2015 22:30 IST