येवला : सायगाव येथील मुंजोबा मित्रपरिवाराने रमजान या पवित्र महिन्यात एक दिवस कडकडीत रोजा (उपवास) धरला व सायंकाळी जामा मज्जीद येथे रोज्याची सांगता केली. आज समाजात जात धर्म यावरून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना सायगाव येथे हिंदू बांधवांनी रोजाचा उपवास करून एकमेकांच्या समाजापोटी आदर व्यक्त करीत ग्रामीण भागात नवीन आदर्श घडविला आहे. सर्जेराव उशीर, सुनील देशमुख, भास्कर गायकवाड, संजय देशमुख, अनंत गाडेकर, संजय मिस्त्री, शरद लोहकरे, अनिल आरोटे, गुलाब उशिर आदिंनी दिवसभर कडकडीत उपवास करून बशीरभाई शेख, गुलाब शेख, फिरोज शेख आदिंनी दिलेल्या फलाहारावर तो सोडण्यात आला. याप्रसंगी जकात, नमाज, रोजा, हाज, कलमा आदि इस्लामच्या प्रमुख तत्त्वांवर चर्चा होऊन हिंदू-मुस्लीम बांधवांनी रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सायगावच्या इतिहासात पहिल्यांदाच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपवास धरून त्याचे पालन केले. (वार्ताहर)