पंचवटी : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी २१ तोळे सोन्यासह सुमारे आठ लाखांची रोकड घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी (दि़ १८) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला़ किराणा व्यावसायिक नेमीचंद माणिकलाल मुनोत यांच्या उमिया अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर सातमध्ये ही घरफोडी झाली आहे़ या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमिया अपार्टमेंटमधील मुनोत कुटुंबीयांच्या नातेवाइकांचे निधन झाल्याने गत तीन दिवसांपासून ते पिंपळगाव बसवंत येथे गेले होते़ सायंकाळच्या सुमारास या अपार्टमेंटच्या चेअरमनच्या मुलास मुनोत कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला़ (पान ७ वर)त्याने भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घराजवळ किराणा दुकान असलेल्या मुनोत कुटुंबीयांना दरवाजाची कडी तोडल्याची माहिती देताच कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली़मुनोत कुटुुंबीयांनी फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले़ तसेच कपाटातील सोन्याची बिस्कीटे, मुलांच्या लग्नातील सोन्याचे दागिने व सुमारे आठ लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज असून चोरी गेलेले सोने एक किलोपेक्षा अधिक असल्याचे वृत्त आहे़ या चोरट्यांनी कपाटातील चांदीच्या वस्तू व सुटे पैसे मात्र तसेच ठेवले़ दरम्यान या इमारतीतून एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिवा दुचाकीवरून आलेले दोघे संशयित तरुण गेल्याची चर्चा आहे़या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान, चोरट्यांच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू होते़ या घरफोडीत चोरी गेलेले सोने व रकमेबाबत चौकशी सुरू होती़ तसेच रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता़(वार्ताहर)
घरफोडीत २१ तोळे सोन्यासह रोकड लंपास
By admin | Updated: November 19, 2015 00:12 IST