तळेगाव रोही : परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता स्थानिक पातळीवर काम नाही. यामुळे तळेगाव रोही, काळखोडे, साळसाणे, वाहेगाव साळ, रेडगाव खुर्द, विटावे, गंगावे, निबांळे येथील महिला वर्गास पहाटे चार वाजता उठून सकाळी आठ वाजेपर्यंत घाई गर्दीत स्वयंपाक, भांडीकुंडी, धुणी आटोपून निफाड तालुक्यात कामाला जावे लागत आहे. रात्री उशिरा घरी परत येऊन घरातील काम उरकत आहे. त्यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. महाराष्ट्रातील अनेक गावांना बेमोसमी पाऊस होत असला तरी तळेगाव रोही परिसरात मात्र पावसाची वक्रदृष्टी दिसत आहे. परिसरातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. जनावरांना चारा नाही. काही शेतकरी ऐंशी-नव्वद हजार रुपयांची बैलजोडी वीस ते पंचवीस हजार रुपयात कवडीमोल किमतीत विकत आहे. अशा भीषण दुष्काळामुळे सोनीसांगवी येथील तरुण शेतकरी रामदास ठाकरे यांना घोडी कप्पी तुटून अंगावर पडल्याने प्राण गमवावा लागला. तो फक्त दुष्काळात उदरनिर्वाहसाठीच असे बोलले जात आहे. शासनाने मांजरपाडा प्रकल्प त्वरित पूर्ण करून अवर्षणग्रस्त तालुक्याला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)
मजुरांचे स्थलांतर
By admin | Updated: November 25, 2015 22:41 IST