नाशिक/ घोटी : प्रभू श्रीरामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय असा जयजयकार करीत ब्रह्मनादात कपिल महामुनींच्या भूमीत मंगलमय वातावरणात ध्वजारोहण सोहळ्याने कुंभपर्वास प्रारंभ झाला. कपिलधारा तीर्थावर पंचरंगी ध्वजा फडकली आणि भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रभू रामाचा जयजयकार केला. इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिलधारा तीर्थावर ध्वजारोहण आणि जलपूजनाने सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजून सात मिनिटांनी श्री स्वरूप संप्रदायाचे नरेंद्र महाराज व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तिन्ही अनी आखाड्यांचे साधू-महंत, राजकीय नेते आणि हजारो भविकांच्या उपस्थितीत आणि वरुणराजाच्या साक्षीने जय सियारामच्या जयघोषात ध्वजारोहण आणि जलपूजन करण्यात आले. प्रारंभी साधू-महंतांची व ध्वजाची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वजधारी महिला, मिरवणुकीच्या अग्रभागी कलशधारी महिला होत्या. ग्यानदास महाराज आणि नरेंद्र महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चाराने आरोहण करण्यात आले. या सोहळ्यानंतर सर्व साधू-महंतांनी कपिलधारा कुंडावर विधिवत जलपूजन केले.यावेळी आयोजित सोहळ्यात नरेंद्र महाराज यांनी कुंभमेळ्याचे पवित्र स्थान म्हणून कावनईचे महत्त्व असल्याचे सांगितले. कावनई पुण्यभूमीत अमृत कुंभातील एक थेंब पडल्याने ही भूमी पावन झाली आहे. मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे आणि कुंभस्थाने या महाराष्ट्रात असल्याने मानवी जीवनाचे सार्थक झाले आहे, असे यावेळी नरेंद्र महाराज म्हणाले. कावनई हे पवित्र क्षेत्र असून, देशातील दहा कुंभस्नान चौकीपैकी एक असल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले. कपिलधारा येथे स्नान केल्याने कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य लाभते, असेही ते म्हणाले. यावेळी महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांनी सोहळ्यास उपस्थित साधू-महंतांचे स्वागत केले. कुंभमेळा या कल्याणकारी सोहळ्याचे मूळ स्थान असलेल्या कावनई येथे स्नान केल्यास कुंभपर्वकाळातील पुण्य लाभते, असे सांगितले. तिनही अनी आखाड्यांचे महंत, साधू या ठिकाणी आल्याने या स्थानाचे महत्त्व अधोरेखित झाल्याचेही ते म्हणाले. ध्वजारोहण सोहळ्यास खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके, अलका जाधव, पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे यांच्यासह पंच दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, महंत धरदास महाराज, निर्मोही आखाड्याचे महंत अयोध्यादास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, चतु:सप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज, नाशिक आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत भक्तिचरणदास महाराज, कपिलधारा ट्रस्टचे कुलदीप चौधरी, सरपंच ज्ञानेश्वर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कुंभपर्व : शोभायात्रेने सिंहस्थ सोहळ्यास प्रारंभ
By admin | Updated: July 16, 2015 23:47 IST