नाशिक : नियुक्तीच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेले महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे यांची अखेरीस राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत त्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता मावळली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना खंदारे यांनी अनेक वादग्रस्त तसेच सत्तारूढ मनसेला पोषक निर्णय घेतल्याची तक्रार नगरसेवक संजय चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे गेल्या महिन्यातच त्यांची बदली करण्यात आली आणि आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता; परंतु खंदारे यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. ते महापालिकेत पुन्हा येणार असल्याची चर्चा होती; परंतु आता त्यांची महामंडळात नियुक्तीचे अधिकृत आदेश निघाल्याने महापालिकेत पुन्हा रुजू होण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक सोनाली पोंक्षे- वायंगणकर यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
खंदारे यांची महामंडळात नियुक्ती
By admin | Updated: May 31, 2014 00:19 IST