नाशिक: सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची दक्षता घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करण्यास महामंडळाला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवाशांकडून सुरक्षिततेची बेफिकिरी दिसून आली. प्रवासी मास्क वापरत असले तरी तो नाकातोंडाला न लावता हनुवटीवर ठेवूनच प्रवास करीत असल्याची बाब नाशिक-त्र्यंबकेश्वर बसमध्ये दिसून आली.
प्रवाशांकडून कोरोनासंदर्भात किती काळजी घेतली जाते याविषयीचे ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला असता त्यामध्ये प्रवाशांची बेजबाबदारी दिसून आली. जुने सीबीएस येथून ४० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन निघालेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या महिरावणी पर्यंत कायम होती. मधल्या बसथांब्यावर किरकोळच प्रवाशांची चढउतार झाली. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी जवळपास ८० टक्के प्रवासी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. ज्यांच्याजवळ मास्क होता त्यांनी तो केवळ हनुवटीवर ठेवल्याचे दिसून आले. त्यातील वयोवृद्ध प्रवाशांनी केवळ उपरणे गुंडाळल्याचे तर काही मुली स्कार्फ चेहऱ्याला गुंडाळून होत्या. वयोवृद्ध महिलांनी तर मास्कही लावलेला दिसला नाही.
चालकाने तर संपूर्ण प्रवासात मास्क वापरलाच नाही तर महिला वाहक मात्र जागरुक दिसल्या. संपूर्ण प्रवासात त्यांचा मास्क कायम होता. याच बसमधून प्रवास करणाऱ्या महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याने संपूर्ण प्रवासात मास्क वापरलाच नाही.
--इन्फो--
लोकमतचा एस.टी. प्रवास
नाशिक-त्र्यंबकेश्वर
वेळ: दुपारी १२.४५
प्रवासी: ४०
--इन्फो--
कुठल्या बसस्थानकावर किती चढले उतरले
सातपूर गाव
सातपूर गाव येथे बस आल्यानंतर बसमधून कुणीही उतरले नाही; मात्र तीन महिला आणि एक पुरुष असे चार प्रवासी बसमध्ये बसले. महिलांपैकी कुणीही मास्क लावलेला नव्हता.
त्र्यंबक विद्यामंदिर:
त्र्यंबक विद्यामंदिर येथे केवळ एक प्रवासी उतरला तर अन्य कुणी प्रवासी बसमध्ये चढला नाही.
बेलगाव ढगा:
बेलगाव ढगा येथे देखील एक प्रवासी बसमधून उतरला. त्याने तोंडाला व्यवस्थित मास्क लावल्याचे तसेच तिकीट जपून ठेवल्याचे दिसून आले.
महिरावणी:
या ठिकाणी दोन प्रवासी उतरले तर एक प्रवासी बसमध्ये चढला. या प्रवाशांनी तोंडाला व्यवस्थित मास्क लावला असल्याचे दिसून आले.
--इन्फो--
प्रवासात किती वेळ होता मास्क
१) चालक: सीबीएस ते महिरावणी गावापर्यंत केलेल्या प्रवासात चालकाच्या चेहऱ्यावर मास्क नव्हताच. किंबहुना त्याने मास्क जवळ बाळगला नसल्याचेही दिसून आले.
२) वाहक: सीबीएस ते महिरावणी या मार्गावर संपूर्ण वेळ महिला वाहकाच्या चेहऱ्यावर मास्क लावला असल्याचे दिसले. मास्कबाबत तसेच सुरक्षिततेची काळजी त्यांच्याकडून घेतली जात होती.
३) प्रवासी: प्रवासी फारसे दक्ष दिसले नाहीत. काहींनी केवळ मास्क हनुवटीवर ठेवलेला होता. त्यातील एकाने तर केवळ रुमाल गळ्यात लावलेला होता तर दोन आजोबांनी केवळ तोंडाला उपरणे लावले होते.