नाशिक : नाशिकरोड-जेलरोड परिसरातील मुस्लीम समुदायाला दफनविधीसाठी गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत होता. दसक शिवारात पुलाजवळ जिलानी सुन्नी मुस्लीम कब्रस्तान सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या वतीने या कब्रस्तानामध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेलरोड भागातून अंत्ययात्रा थेट देवळालीगाव किंवा जुने नाशिक परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी न्यावी लागत होती. यामुळे नाशिकरोड, जेलरोड, नारायणबापूनगर परिसरातील मुस्लीम समुदायाची मोठी गैरसोय होत होती. यासाठी अंजूमन फैजाने हनफिया नुरिया ट्रस्टकडून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. महानगरपालिकेच्या वतीने संस्थेला बारा गुंठे क्षेत्र कब्रस्तानासाठी आरक्षित म्हणून देण्यात आले. या जागेचे संरक्षक कुंपण करून त्या ठिकाणी आमदार बाळासाहेब सानप यांच्या निधीमधून जनाजाच्या नमाजपठणासाठी सभागृही बांधण्यात आले आहे. संस्थेने दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना शुचिर्भूत होण्याची व्यवस्था म्हणून पाणी व धार्मिक शास्त्रीय पद्धतीने वजुखानाही लोकवर्गणीतून उभारला आहे. कब्रस्तान दफनविधीसाठी कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुलगणी शेख यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
जिलानी सुन्नी मुस्लीम कब्रस्तान कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:26 IST