नाशिक : विविध गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही आता आधार कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सोमवारी त्या संदर्भात तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी नाशिकहून सर्व कारागृहाच्या अधीक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संपर्क साधून तशा सूचना केल्या व प्रशासनालाही तातडीने कारागृहात आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. देशातील प्रत्येक नागरिकाची शासनदप्तरी नोंद करून त्याला कायमस्वरूपी एकच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला व त्यादृष्टीने या प्रकल्पात कोट्यवधी नागरिकांनी सहभागी होऊन आधार कार्ड प्राप्तही केले. परंतु तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी व तृतीयपंथीयांबाबतचा तिढा कायम होता. मध्यंतरी तृतीयपंथीयांबाबत शासनाने निर्णय घेऊन त्यांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले. ज्या कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची बहुतांशी माहिती कारागृह व्यवस्थापनाकडे असल्याने त्याचा उपयोग त्यांच्या ओळखीचा पुरावा देण्यास पुरेशी असल्याचे कारागृह व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी नाशिकहून सोमवारी राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला व त्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात येत्या दोन दिवसांत आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांनी दिली.
कारागृहातील कैद्यांनाही ‘आधार’
By admin | Updated: July 29, 2014 00:55 IST