नाशिक : समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले आहे.रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था सेवकांच्या काव्यसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सेवक संचालक नानासाहेब दाते, गुलाब भामरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी.डी. शिंदे आदी उपस्थित होते. प्रकाश होळकर म्हणाले, कविता ही दु:खाच्या जाणिवेचे माध्यम असून, वेगवेगळ्या विषयांवर कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करता येते. या काव्यसंमेलनात संस्थेमधील ३५ शिक्षक कवींनी सहभाग नोंदवला.होळकर यांनी त्यांच्या कविता, चित्रपटातील गाणी, लावणीचा प्रवासही उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. दरम्यान, उपस्थित कवींनी आई, परिवर्तन, स्त्री, स्वातंत्र्य, ताई, ग्रामीण जीवन, सौभाग्याचं लेणं, मविप्र ज्ञानविश्व, शेतकरी बाप, प्रेम आदी विविध विषयांवर काव्यरचनांचे सादरीकरण केले.
कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य : प्रकाश होळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:15 IST