नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत तीन पर्यायांपैकी एक असलेल्या हरित क्षेत्रात टीपी स्कीम (नगररचना योजना)च्या माध्यमातून सुनियोजित टाऊनशिप उभारता येईल काय, यादृष्टीने महापालिका प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर टीपी स्कीमसंबंधी कार्यशाळा सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महापालिकेला हरित क्षेत्र, पुनर्विकास आणि रेट्रोफिटिंग यापैकी एक पर्याय निवडून विकास साधायचा आहे. हरित क्षेत्रासाठी सुमारे ५०० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यात शहरातील विशिष्ट भाग निवडून विकास करायचा आहे. त्यामुळे शहरातील अविकसित भागात सुनियोजित टाऊनशिप नगररचना योजना (टीपी स्किम) या माध्यमातून उभारता येईल काय, याची चाचपणी प्रशासकीय स्तरावरून सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडूनही कोणत्या भागात अशी टाऊनशिप साकारता येऊ शकेल यासंबंधीची मते मागविली आहेत. टीपीस्कीमच्या माध्यमातून टाऊनशिप साकारल्यास त्याचा फायदा महापालिकेला होणार आहे. महापालिकेला विनामोबदला ५० टक्के जागा उपलब्ध होणार असून, त्यातील ३५ टक्के जागेवर विकास करत उर्वरित १५ टक्के जागेच्या माध्यमातून महसूल प्राप्त करता येणार आहे. या योजनेसंबंधी माहिती देण्यासाठी महापालिकेने नगररचना विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील यांची कार्यशाळा येत्या सोमवारी आयोजित केली आहे. या कार्यशाळेला इच्छुक जागा मालक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
हरित क्षेत्रावरील प्रकल्प टीपी स्कीममधून घेण्याची चाचपणी
By admin | Updated: November 9, 2015 22:59 IST