नाशिक : मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत दिल्यास उत्तर महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम होणार असून सरकारने असा दुजाभाव न करता सरसकट सर्वांना वीज देयकात सवलत द्यावी, अथवा एकट्या मराठवाड्यातील उद्योगधंद्यांना सवलत देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन निमाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १२) जिल्हाधिकाऱ्यांना दिले.राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज देयकात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक विकास महामंडळातील उद्योगधंद्यांना वीज दरात सवलत देण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी केली होती; मात्र मुख्यमंत्र्यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना अशी सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक व व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. शुक्रवारी यासंदर्भात निमाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच मराठवाड्याला वीज दरात सवलत दिल्यास उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांवर त्याचे विपरीत परिणाम होईल. त्यामुळे अशी सवलत देण्यात येऊ नये,अशी मागणी केली आहे. यावेळी निमाच्या शिष्टमंडळात संजीव नारंग, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, राजेंद्र अहिरे, संतोष मंडलेचा, विवेक पाटील आदिंचा समावेश होता. (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत नको
By admin | Updated: February 12, 2016 23:42 IST