इगतपुरी : तालुक्यातील विविध समस्यांबाबत न्याय मिळावा, याकरिता भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कामगार, मजूर, शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात येऊन तहसीलदार महेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले.शहरातील तीन लकडीपासून मोर्चाला सुरुवात झाली. कामगार कायद्यातील प्रस्तावित विरोधी बदल त्वरित मागे घेण्यात यावे, किमान वेतन कायद्यासह अन्य कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, बांधकाम व घरेलू कामगारांना पिवळे रेशनकार्ड देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, तालुक्यातील कंपनीची टाळेबंदी उठवावी या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सभेला सीटूचे राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, चंद्रकांत लाखे, आप्पासाहेब भोले, कांतीलाल गरुड आदिंनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
इगतपुरी तहसीलवर भारतीय ट्रेड युनियनचा मोर्चा
By admin | Updated: September 2, 2015 23:06 IST