----
अतिक्रमण काढण्याची मागणी
मालेगाव : शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण वाढत असून, महापालिकेने अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे काही काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते. त्यावेळी काढण्यात आलेले अतिक्रमण काही काळानंतर जैसे थे होत आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
----
रस्ते दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरातील डागडुजी केलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली असून, महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे महापालिकेने तात्पुरती खडी, मुरुम टाकून बुजविले असले, तरी त्याच रस्त्यांवर आणखी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरेगावपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत.
----
गरिबांचा फ्रीज बाजारात
मालेगाव : संक्रांतीनंतर ऊन वाढत जाते. उकाडा वाढू लागल्याने, शहरात सटाणा नाका, कॅम्प रोड या भागात ठिकठिकाणी गरिबांचा फ्रीज समजले जाणारे माठ, सुरया विक्रीसाठी आल्या आहेत. सकाळी वाजणारी थंडी दुपारी गायब होत असून, उन्हाचे चटके बसू लागले आहेत. रात्री पुन्हा गारवा निर्माण होत असल्याने नागरिकांना उकाडा व थंडीचा एकत्र अनुभव घ्यावा लागत आहे.
----
कमी अधिक दाबाने वीजपुरवठा
मालेगाव : शहरात वीज वितरण कंपनीकडून कमी अधिक दाबाने वीजपुरवठा होत असून, विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. सध्या रब्बी हंगामाची पिके जोमात असून, विद्युत मोटारी कमी दाबामुळे सुरू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.