नाशिक : हिरावाडीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअममध्ये गुरुवारी (दि़२३) सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या मतमोजणीप्रसंगी इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करून मतमोजणी केंद्राबाहेर दंगल भडकविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे़ दरम्यान, पंचवटी पोलिसांनी मिळालेल्या व्हिडिओ क्लिपद्वारे संशयितांचा शोध सुरू आहे़ इव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने ठाकरे संकुलाबाहेर गुरुवारी रात्री तीव्र घोषणाबाजी करून पोलिसांवर दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस वाहनांसह दुचाकींचेही नुकसान तर झालेच शिवाय सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले़ तसेच प्रक्षुब्ध जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत चार वेळा गोळीबारही करावा लागला़ (प्रतिनिधी)प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखलहिरावाडीतील ठाकरे स्टेडिअमबाहेर दंगल घडवून आणण्यास कारणीभूत असणाऱ्या सुमारे ३० ते ३५ संशयितांवर दंगल घडवून आणणे, बेदम मारहाण, शासकीय कामात अडथळा यांसह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी अटक केलेले संशयित विशाल कदम, अमोल कदम, हेमंत अहिरराव, कुंदन वैद्य यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यामध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे़
दंगलीतील संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: February 26, 2017 22:58 IST