इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील श्रद्धा रो-हाउस रस्त्याच्या कॉर्नरला असलेल्या पडीक धोकादायक विहिरीमुळे दुर्घटनेत वाढ होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. तातडीने विहीर बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सुमारे ५० वर्षांपूर्वी श्रद्धाविहार कॉलनी आणि श्रद्धाविहार रो-हाउस परिसरात शेती व्यवसाय होता. शेती व्यवसायासाठी पाच ते सहा विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परंतु जमिनीस जसजसा भाव मिळत गेला तसतशी एक एक करून जमिनीची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतीच्या जागेवर कॉलनी, अपार्टमेंट व सोसायट्या तयार झाल्या आहेत. सुमारे ४० वर्षांपासून वापरविना विहिरी पडून आहेत. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून श्रद्धाविहार रो-हाउस मार्गे पांडवनगरीसह परिसरात ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने कॉलनी रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. श्रद्धा रो-हाउस रस्त्याच्या कॉर्नरलाच पडीक धोकादायक विहिरीस संरक्षण भिंत नसल्याने वळताना दिसून न आल्यास वाहने विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर चार दिवसांपूर्वी विहिरीलगत मैदान असल्याने क्रिकेट खेळतांना चेंडू पकडण्याच्या नांदात एक मुलगा विहिरीत पडला होता. तातडीने त्याच्या मित्रांनी जिवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारून त्यांचे प्राण वाचविले. विहिरीमध्ये संपूर्ण कचरा भरलेला आहे. तातडीने विहिरीस बंदिस्त करण्याची मागणी होत आहे.
धोकादायक विहिरींमुळे दुर्घटनांमध्ये वाढ
By admin | Updated: March 16, 2016 08:27 IST