देवगाव (त्र्यंबकेश्वर) : कोरोनामुळे बंद पडलेल्या बसच्या फेऱ्यांचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने बंद पडलेली लाल परीची चाके पुन्हा रस्त्यावर धावावीत, अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची पकड जराशी सैल होताच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, वसतिगृह आणि बसच्या फेऱ्या अद्याप पूर्ववत नसल्याने त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असून, वेळेवर वाहन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. देवगावसह वावीहर्ष, टाकेदेवगाव आदी परिसरातील विद्यार्थी वैतरणा येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकत आहेत मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांना ये-जा करणे मुश्कील होत असून, खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. परंतु, खासगी वाहनेदेखील त्यांच्या वेळेनुसार धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचे होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या विळख्याने लालपरीची चाके ग्रामीण भागात वळली नव्हती. दिसेनाशी झालेल्या लालपरीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह महिला-पुरुष आणि ज्येष्ठांही लागून होती. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच काही बसच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, अचानकपणे सुरू झालेल्या बसफेऱ्या मधेच बंद झाल्या. त्यामुळे सद्य:स्थितीत एकही बस ग्रामीण भागातील रस्त्यांवरून धावताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्र्यंबकेश्वर-देवगाव-येल्याचीमेट-घोटी ही एकमेव बस कोरोनानंतर सुरू झाली होती. या बसचा वेळ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेप्रमाणे असल्यामुळे हीच बस विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होती. मात्र, अचानकपणे सुरळीत असणारी बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊन प्रवासाला ब्रेक लागला आहे. बसअभावी रुग्ण, शेतकरी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
---
खासगी वाहनांकडून प्रवाशांची लयलूट
बससेवा बंदचा खासगी वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला असून, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांकडे बसपास असतो तर ज्येष्ठ नागरिकांकडे एकतृतीयांश भाडे असल्यामुळे खासगी वाहनांतून प्रवास करताना अधिक पैसे द्यावे लागतात.
-----
बस नसल्यामुळे आम्हांला तासन्तास बसून खासगी वाहनांची वाट बघावी लागते. खासगी वाहनांमध्ये दाटीवाटीने जागा नसल्यामुळे बसावे लागते. कधी कधी जागेअभावी जीपला लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बंद असलेली येल्याचीमेट बस लवकर सुरू करावी.
- सिद्धांत रोकडे, विद्यार्थी, देवगाव