लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

By Suyog.joshi | Published: March 5, 2024 05:09 PM2024-03-05T17:09:43+5:302024-03-05T17:10:16+5:30

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

in nashik road from trimbak naka to ashok stambh has been opened for traffic after the cpim movement ended | लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

नाशिक (सुयोग जोशी) : तब्बल आठवडाभरानंतर माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काही आंदोलक रात्री उशिरापर्यंत तर काहीजण मंगळवारी दुपारपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. आंदोलकांना घरी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेसची सोय करण्यात आली होती, तर काहीजणांनी सोबत आणलेल्या वाहनांतूनच घरी जाणे पसंत केले. 

या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात मुख्यत्वेकरून सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबक, कळवण, चांदवड तालुक्यातील कार्यकर्ते अधिक प्रमाणात सहभागी झाले होते. यात दिंडोरीचे रमेश चौधरी, देवीदास वाघ, माकपचे जिल्हा सदस्य संजाबाई खंबाईत, निर्मला चौधरी, चंद्रकांत वाघेरे, वसंतराव बागुल, माजी सभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू, भिका राठोड, बाऱ्हेचे सरपंच देवीदास गावित, किसान सभेचे कार्यकारी सदस्य सावळीराम पवार, सुरगाणा तालुक्याचे सुभाष चाैधरी, त्र्यंबकचे इरफान शेख, रमेश बरफ, पेठमधून देवराम गायकवाड, मुरलीधर निंबकर, प्रभाकर गावित, चांदवडचे हनुमान गुंजाळ, कळवणचे संदीप वाघ, विलास चव्हाण, निंबा सोनवणे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शासनाने मागण्यांच्या पूर्ततेबाबत आम्हाला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. शासनाच्या आग्रहास्तव आम्ही आंदोलन मागे घेतले आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्षेत काय अंमलबजावणी केली जाते त्याकडे आमचे लक्ष राहील. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. -जे.पी. गावित, माजी आमदार

मनपातर्फे परिसराची स्वच्छता : आंदोलक ज्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या देऊन बसले होते, त्या परिसराची महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभाच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी ३० साफसफाई कर्मचारी तसेच स्विपिंग मशीनचा वापर करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याची माहिती विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, उरलेली लाकडं, राख, डिव्हायडर्समधील कचरा उचलला.

स्मार्ट रोड खुला : पालकमंत्री दादा भुसे व माजी आमदार जे. पी. गावित यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर काही आंदोलकांनी सोमवारी रात्रीच घराकडे कूच केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान स्मार्ट रोड खुला झाला. यामुळे सकाळपासून त्र्यंबक नाक्याकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली होती. मेहर सिग्नल ते महात्मा गांधी रोडपर्यंतचा रस्ताही बंद करण्यात आला होता. तोही रस्ता सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे रविवार कारंजाकडे अशोकस्तंभावरून जाणारी वाहतूक आता पूर्णत: मोकळी झाली आहे.

Web Title: in nashik road from trimbak naka to ashok stambh has been opened for traffic after the cpim movement ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.