नाशिक : रेल्वे भरती बोर्डाच्या एनटीपीसी परीक्षेस डमी बसून तोतयागिरी करणाऱ्या परीक्षार्थीसह मूळ परीक्षार्थीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील अशोका बिझनेस इनक्युजमध्ये गुरुवारी (दि़ १९) रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होती़ या परीक्षेसाठी संशयित मुस्तकीम जाफरी (रा़ केशवगाव, केशवा, आंचसपिरो, जि़ भोजपूर, बिहार) हा मूळ परीक्षार्थी होता़ त्याने नियोजित वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश करून सर्व सोपस्कार पार पाडले़ यानंतर केंद्रप्रमुख आदित्य बिडवे (२६, रा़ मंजुळा सोसायटी, नाशिकरोड) यांना लघुशंकेसाठी जायचे आहे असे सांगून बाहेर पडला़ यानंतर काही वेळातच त्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी संशयित सुनीलकुमार भिकारीराम (२६,रा़ बदहरी, करहर, जि़ राहतास, बिहार) हा परीक्षेसाठी येऊन बसला़ या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणारा परीक्षार्थी मुस्तकीम याचे ओळखपत्रावरील छायाचित्र व्यवस्थित लावले नसल्याचे पर्यवेक्षक पगारे यांच्या लक्षात आले़ त्यांनी संबंंधित विद्यार्थ्याच्या जागेवर जाऊन बघितले असता मुस्तकीमऐवजी दुसराच परीक्षार्थी असल्याचे लक्षात आले़ त्यांनी ही बाब केंद्रप्रमुख बिडवे यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी मुंबई नाका पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली़ दरम्यान, या प्रकरणी बिडवे यांच्या फिर्यादीवरून संशयित मुस्तकीम व सुनीलकुमार विरोधात फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
रेल्वे भरती परीक्षेत परप्रांतीयांची तोतयागिरी
By admin | Updated: January 20, 2017 23:14 IST