नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होऊ लागल्यावर कोरोना काळात भरती केलेल्या ७०८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र, एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती, तसेच कर्मचारी भरतीचे नियोजन केले जात असताना गतवर्षी ऑगस्टमध्ये भरती करण्यात आल्यानंतर जिवावर उदार होऊन काम केलेल्या ७०८ कंत्राटी कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याने शासन, प्रशासनाच्या धोरणाबाबत रोष प्रकट होऊ लागला. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून काही काळ तरी या कंत्राटी कामगारांना दिलासा दिला आहे.
आरोग्य विभागांच्या कोविड सेंटरमध्ये, रुग्णालयांमध्ये कोरोना काळात या कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून कार्य केले. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात केलेल्या भरतीनंतर दर तीन महिन्यांनी एकेका दिवसाचा ब्रेक देत पुन्हा कामावर रुजू करून घेतले होते. मात्र, यावेळी कोरोना योद्ध्यांना कायमचा ब्रेक देण्यात आलेला असल्याने त्यांच्या नोकरीवर अचानकच गंडांतर आले. कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे कंत्राटी कर्मचारी त्यामुळे बेरोजगार झाले होते. कोरोना महामारीत काम करणाऱ्या कोणालाही कामावरून कमी करणे हा त्यांच्यावर अन्यायच असल्याची या कोरोना योद्ध्यांची भूमिका होती. जेव्हा कुटुंबीयदेखील कोरोना रुग्णांच्या जवळपास जायला घाबरत होते, त्यावेळी या सर्व कोरोना योद्ध्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेचा विचार करून अशा प्रकारची कृती तडकाफडकी करणे अयोग्य असल्याचे बहुतांश कोरोना योद्ध्यांचे म्हणणे होते.
इन्फो
पुन्हा तिसरी लाट आली तर...
जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने बाधित तीस रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा तिसरी लाट आलीच आणि डेल्टामुळे दुसऱ्या लाटेपेक्षाही अधिक वेगाने प्रसार होऊ लागल्यास प्रशासनासमोर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी अननुभवी असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यांनाच अजून काही काळ तरी मुदतवाढ देणे नितांत गरजेचे होते. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
इन्फो
४० टक्के कर्मचारी कमी असल्याने मुभा
या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भुजबळ यांनी प्रशासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतची आकडेवारी जाणून घेत आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यात आधीच ४० टक्के आरोग्य कर्मचारी कमी असून, तिसऱ्या लाटेची शक्यता असताना या कर्मचाऱ्यांची कपात करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगितले. तसेच टोपे यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कर्मचारी कपातीबाबतच्या निर्णयातून नाशिकला वगळण्यास सांगितल्यानंतर तसे आदेश जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
-----------------------