नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीसाठी विविध सेवाभावी संस्था आणि संघटना आपापल्या पातळीवर सेवा देण्यासाठी पुढे आलेल्या असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचेही ११२ डॉक्टरांची सहा पथके आपत्कालीन स्थितीत रुग्णसेवा देण्यासाठी गोदाघाट, तपोवन परिसरात तैनात राहणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली शाही पर्वणी शनिवारी (दि.२९) असून शाहीस्नान आणि शाही मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्णत्वाला आली आहे. प्रामुख्याने गोदाघाट, तपोवनातील साधुग्राम आणि शाही मार्गावर महापालिका आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक तैनात राहणार आहेत. त्यासाठी फिरते दवाखानेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या संस्था-संघटनांकडून विविध स्वरूपात सेवा देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला जात असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेनेही आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांची सहा पथके तयार केली असून ती गोदाघाट, तपोवन परिसर तसेच महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच तपोवनातील सिंहस्थानिमित्त उभारण्यात आलेल्या रुग्णालयात तैनात केली जाणार आहेत. एका पथकात सुमारे १८ डॉक्टर्स राहणार असून दोन शिफ्टमध्ये सदर डॉक्टर्स रुग्णसेवा पुरविणार आहेत. या डॉक्टरांना शुक्रवारी अॅप्रॅनचे वाटप करण्यात आले व त्यांना सूचनाही देण्यात आल्या. आपत्कालीन स्थितीत गरज भासल्यास शहरातील काही खासगी नामवंत हॉस्पिटलमध्येही काही खाटा राखून ठेवण्यात आल्या असून तसा प्रशिक्षित कर्मचारीवर्गही आयएमएने तैनात केला आहे. खासगी हॉस्पिटलचालकांची, रुग्णवाहिकाही सज्ज ठेवल्या आहेत. (प्रतिनिधी)
‘आयएमए’चे ११२ डॉक्टर भाविकांच्या सेवेत
By admin | Updated: August 28, 2015 23:31 IST