नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या निर्मितीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने शासनाने नेमून दिलेल्या जागेऐवजी विल्होळी शिवारातून मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या वाहनांवर तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई केली असून, अन्य एका कारवाईत वाळूने भरलेल्या ट्रकचालकाविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात नाशिक तहसील कार्यालयाने उघडलेल्या गौण खनिजाच्या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्धच्या मोहिमेत दहा वाहने पकडण्यात आली आहे. साधुग्रामच्या विस्तारीकरणाचा ठेका घेतलेल्या आयआरबी कंपनीने साधुग्रामसाठी लागणाऱ्या मुरुमाच्या उत्खननासाठी अधिकृत परवाना घेतलेला असला तरी, त्यांना मखमलाबाद शिवारातून उत्खनन करावे, असे आदेश आहेत. प्रत्यक्षात ठेकेदाराकडून विल्होळी शिवारातून मुरुमाचे उत्खनन केले जात असल्याचे मंगळवारी दुपारी पकडलेल्या गाड्यांमुळे लक्षात आले. सोमवार दुपारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सर्व प्रथम सातपूर येथे वाळूचा मालट्रक पकडण्यात येवून त्याच्या चालकाकडून सुमारे दीड लाख रूपये दंड वसूल करण्यात आला, तर मध्यरात्री तहसीलदार गणेश राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबादरोडवरील जनार्दन स्वामी आश्रमाजवळ वाळूने भरलेला मालट्रक पकडून ९० हजाराचा दंड ठोठावला. मंगळवारी दुपारी विल्होळी व सारूळ शिवारातील एका टेकडीचे उत्खनन करताना मरुमाचे सहा ट्रक व एक ट्रॅक्टर पकडण्यात आला. यातील दोन मालट्रकचालकांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
साधुग्रामसाठी बेकायदेशीर उत्खनन
By admin | Updated: March 26, 2015 23:53 IST