नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांबाबत तिढा कायम असून, सोमवारी (दि.१०) यासंदर्भात मनीषा बोडके यांची मनधरणी करण्यात येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.७) राष्ट्रवादीच्या संगीता राजेंद्र ढगे यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी राष्ट्रवादीकडून शैलेश सूर्यवंशी व कृष्णराव गुंड यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यांनी स्थायी समितीच्या रिक्त जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे केदा अहेर यांची जागा रिक्त झाल्याने भाजपाने त्यांच्या जागी सौ. मनीषा श्याम बोडके यांचा अर्ज दाखल केला आहे, तर कॉँग्रेसकडून माजी सभापती सुनीता अहेर यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यात सुनीता अहेर यांचा स्थायी समितीसाठी उमेदवारी अर्ज भरलाच नसल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी स्वत: सुनीता अहेर यांनी मात्र आपण स्थायी समितीच्या रिक्त पदासाठी अर्ज दाखल केला असून, त्या अर्जाची माघार घेतलेली नाही,असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या दोन रिक्त जागांसाठी आता एकूण चार अर्ज असल्याचे कळते. त्यात राष्ट्रवादीच्या दोघा सदस्यांचे अर्ज असून, त्याचबरोबर मनीषा बोडके व सुनीता अहेर यांचे अर्ज असल्याने या चारपैकी दोघांनी माघार घेतली तरच स्थायी समितीच्या दोन सदस्यांची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अन्यथा निवडणूक अटळ असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे मनीषा श्याम बोडके यांच्या माघारीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याचे कळते. (प्रतिनिधी)
स्थायी समितीच्या रिक्त जागांचा तिढा कायम दोन जागांसाठी तीन अर्ज राहिल्यास निवडणूक अटळ
By admin | Updated: November 9, 2014 00:09 IST