पांडुरंग अहिरे तळवाडे दिगरगावात बगीचा असावा की गावच बगीचा असावे या भावनेने गावकऱ्यांनी विविध वनरार्इंनी नटवलेल्या किकवारी खुर्द गावात ऐन उन्हाळ्यात असंख्य प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन घडत असल्याने आदर्श गावाबरोबरच पक्ष्यांचे गाव अशी ओळख या गावाची निर्माण होऊ लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सहलीसाठी थंड हवेचे ठिकाण म्हणून आदर्श गाव किकवारी खु. या ठिकाणी अनेक पर्यटक तसेच शाळकरी विद्यार्थी येत असतात. गावाच्या वेशीपासूनच गावात काहीतरी आगळं वेगळं बघावयास मिळेल अशी उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना गावात प्रवेश करताच पर्यटकांचे स्वागत होते ते वृक्षांवर बसलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने व रंगीबेरंगी पक्ष्यांच्या दर्शनाने. किकवारी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी दरवर्षी वृक्षलागवड केली जाते. सर्वत्र उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असताना वृक्षवेलींनी नटलेल्या गावात परिसरातील असंख्य पक्ष्यांनी निवाऱ्यासाठी आपल्या आवडीचे ठिकाण निवडले आहे. गावामध्ये वड, उंबर, पेरू, पायर, लिंब, पिंपळ जांभूळ आदींसारखे वृक्ष असल्याने पक्ष्यांना ऋतूप्रमाणे नैसर्गिक आहार मिळत असून, गावकऱ्यांनीही खरकटे अन्नपदार्थ फेकून न देता ते वाळवून परसबागेत ठेवावे असा नियम ग्रामपंचायतीने केला आहे. संपूर्ण गाव व शिवार जलयुक्त असल्याने मुबलक पाणीही त्याठिकाणी उपलब्ध आहे. पहाटे चार वाजल्यापासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होत असल्याने गावकऱ्यांना पहाटेच्या गजराची गरज भासत नाही. सूर्योदयानंतर पक्ष्यांचे थवे मग आपल्या उपजीविकेसाठी वेगवेगळ्या दिशेने प्रयाण करतात. शेत मशागतीच्या वेळी जमिनीआड लपलेले कृमी किटक त्यांचे भक्ष्य बनल्याने नकळत शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्चही वाचतो. एकूणच निसर्गाचा समतोल सर्वत्र बिघडत असताना आदर्श गावातील हा आदर्श प्रयोग सर्वांसाठी आदर्श ठरेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आदर्श किकवारी खुर्द बनले पक्ष्यांचे गाव !
By admin | Updated: April 29, 2017 01:30 IST