नाशिक : पहाटेच्या सूर्यकिरणांच्या साथीने व साक्षीने सुरेल स्वरही उमलू लागले... रागदारीतले शास्त्रीय गायन असो की अभंगवाणी, या स्वराविष्कारात रसिक देहभान विसरले अन् भाऊबिजेची पहाट सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर प्रगटली...निमित्त होते आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या वतीने आयोजित प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टीकेकर यांच्या गायन मैफलीचे. गंगापूर रोड येथील प्रमोद महाजन उद्यानात भाऊबिजेच्या पहाटे ही मैफली रंगली. अंकलीकर-टीकेकर यांनी सालग वराळी रागाने गायनाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ अभंग सादर करीत वातावरण भक्तिमय केले. द्वितीय सत्रात त्यांनी राग जयजयवंती पेश करीत कानसेनांना तृप्त केले. त्यानंतर ‘मी राधिका’ हे भावगीत सादर केले. ‘अवघा रंग एकचि झाला’ या अभंगाने मैफलीचा समारोप झाला. वैभव खांडोलकर (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गणेश बापट (पखावज), स्वरूपा बर्वे (तानपुरा) यांनी त्यांना संगीतसाथ दिली. श्याम पाडेकर यांनी निवेदन केले. आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस अकादमीचे सहायक संचालक हरीश बैजल, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे, विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, अभिनेते दीपक करंजीकर, विद्या करंजीकर, सुरेश पाटील, गोपाळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रा. फरांदे व भाजपाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
श्यामक्षण जगले मी राधिका...
By admin | Updated: November 14, 2015 22:20 IST