निफाड : तालुक्यातील दिंडोरी (तास) येथे रात्री बिबट्याने पोल्ट्री फॉर्ममध्ये शिरून केलेल्या हल्ल्यात शेकडो कोंबड्या ठार झाल्याची घटना घडली. दिंडोरी (तास) येथे मराठी शाळेजवळ नंदू पुंडलीक जाधव यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये रात्री १.३० वाजेच्या सुमारास बिबट्याने पोल्ट्री फॉर्मची जाळी तोडून आत प्रवेश करून कोंबड्यांवर हल्ला करीत कोंबड्यांचा फडशा पाडण्याचा प्रकार सुरू केला. यात असंख्य कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झाल्या. परंतु काही कोंबड्या सैरभैर झाल्याने बिबट्याखाली चेंगरून मेल्या तर काही गुदमरून मेल्या. या हल्ल्यात एकूण ९५० कोंबड्या मृत झाल्या. कोंबड्यांच्या आवाजाने जाधव कुटुंबिय जागे झाले व त्यांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केल्याने बिबट्याफरार झाला. घटनास्थळी मनमाड वनविभागाचे वनपाल सुद्रीक यांनी भेट देऊन मृत कोंबड्यांचा पंचनामा केला. या घटनेत जाधव यांचे एक लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले असून, वनविभागाने व पोलीस विभागाने सामाजिक प्रबोधन म्हणून बिबट्यासंदर्भात शेतकरी, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो कोंबड्या ठार
By admin | Updated: September 26, 2014 23:55 IST