लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या घरफोडीसत्रामुळे नागरिक धास्तावले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़ सातपुर कॉलनीतील शिवनेरी गार्डन परिसरातील भाऊसाहेब चव्हाण हे बुधवारी(दि़७) कामावर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांचे व शेजारी राहणारे विशाल आहेर यांच्या घरांचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ त्यापैकी चव्हाण यांच्या घरातील सोन्याचांदीचे दागिणे,रोख रक्कम असा ३१ हजार रुपयांचा तर आहेर यांच्या घरातून एलईडी टिव्ही,मिक्सर आणि रोकड असा हजारोंचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घरफोडीची घटना पेठरोड परिसरातील दुर्गानगरमध्ये घडली़ शिवराष्ट्र सोसायटीतील ज्ञानेश्वर गुंजाळ हे कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्याचांदीचे दागिणे,रोकड,साड्या,कॅमेरा व लॅपटॉप असा ६९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरफोडीची तिसरी घटना सिडकोतील गणेश चौकात घडली़ कैलास गुरव (रा.एमएसईबी मागे) हे बुधवारी (दि़७) सकाळी कुटुंबियांसह बाहेर गेले होते़ चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच कपाटातील सोन्याचे दागिणे,रोकड व मोबाईल असा ५७ हजार ९०० रूपयांचा ऐवज ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़