नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार जिल्ह्यात २०३१ मतदार हे शंभरीतले असल्याचे समोर आले आहे. जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या मतदारयादी पडताळणी मोहिमेनंतर अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पश्चिममध्ये सर्वात कमी शंभरीतले मतदार आहेत.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार राबविण्यात आलेल्या मतदारयादी पडताळणी मोहिमेत यंदा जिल्ह्यातील मतदारांची संख्या घटली असल्याचे दि्सत असले तरी बोगस नावे कमी होणेच अपेक्षित असल्याने अंतिम मतदारांची संख्या ४५,६४,१२९ इतकी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २३,८५,६८३, तर महिला मतदारांची संख्या २१,७४,४१९ इतकी झाली आहे. मतदारयादी पडताळणी मोहिमेत लिंग आणि वयोमानानुसार यादी अद्ययावत करण्यात आली आहे.
अंतिम मतदारयादीनुसार जिल्ह्यात २०३१ इतके मतदार हे वय वर्ष शंभरीतले आहेत. त्यामध्ये शंभरीत पदार्पण करणारे, तसेच शंभरी झालेले असेदेखील मतदार आहेत. जिल्ह्यातील निवडणुकीत ज्येष्ठ मतदारांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. मतदानाचा हक्क बजावणे कर्तव्य असल्याची भावना जोपसणारे ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे त्यांच्यातील मतदानाचा उत्साह प्रत्येक निवडणुकीत समोर येतो.
इन्फो---
६३ हजार नवमतदारांची नोंद
नवमतदारांचे नाव मतदारयादीत नोंदविण्यासाठी जिल्ह्यात विशेष मेाहीम राबविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात नवमतदारांची संख्या ६३ हजार २० इतकी नोंदली गेली असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. मतदारयादी पडताळणी मोहिमेत दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्यात आली, तर विशेष मतदार नोंदणी अभियानात नवमतदारांची नावनोंदणी करण्यात आली.