सिडको : अपघातामुळे दोन्ही पाय गमावलेले...कौटुंबिक परिस्थिती बेताचीच अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिला शिकण्याची प्रचंड जिद्द. अभ्यासात हुशार असल्याने आई-वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांनी दिलेल्या पाठबळावर नेहाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. शिष्यवृत्तीसाठी तिच्या वयाचे आणि तिच्याच वर्गातील मित्र- मैत्रिणी वर्गात परीक्षा देत असताना नेहाने परीक्षा केंद्राबाहेर कार्डीयाक व्हॅनमध्ये बसून परीक्षा दिली. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या ५ डिसेंबर रोजी एका ट्रक अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या नेहा शशिकांत वराडे या नऊ वर्षीय बालिकेच्या जिद्दीपुढे आज सारे थिटे भासत होते. सिडकोतील शुभम पार्क येथे झालेल्या एका दुर्दैवी अपघातात नेहाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. मरणाच्या दारातून परतलेली नेहा मात्र अपघात झाल्यापासून बेडवरच पडून आहे. तिला इतरांच्या मदतीशिवाय उठणेही शक्य होत नाही. अशाही परिस्थितीने तिने चौथीची शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. सिडकोतील पवननगर येथील जनता विद्यालयात शिष्यवृत्तीची परीक्षा होती. शाळेचा परिसर आणि सर्व वर्ग खोल्या चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. नेहा मात्र व्हॅनमध्ये बसून निमूट सारे पाहत होती. तिच्या डोळ्यातील असह्यतेचे भाव मात्र लपत नव्हते; परंतु जिद्दीची चमक तिच्या नजरेतून जाणवत होती. प्रश्नपत्रिकेची वाट पाहणारी नेहा परीक्षेविषयी आपली आई आणि शिक्षकांना सारखी विचारणा करीत होती. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर तिने अत्यंत शांत आणि सयंमाने संपूर्ण परीक्षा दिली. सकाळी ११ ते ४ अशा वेळात झालेली परीक्षा तिने अत्यंत संयमाने दिली. आपण या परीक्षेत मेरीटमध्ये येऊ असा आत्मविश्वात तिने व्यक्त केला. आपल्या मुलीची जिद्द पाहून पालकांनी सिडकोतील कार्डीयाक व्हॅनचे मालक गोविंद घुगे यांच्याकडे याचना केली. त्यांनाही माणुसकीचा गहिवर आला. त्यांनीही लगेचच नेहासाठी आपली कार्डीयाक व्हॅन उपलब्ध करून दिली. गाडीचा चालक सुरेश पवार यांनीही नेहाची काळजी घेतली आणि नेहाची परीक्षा सुरळीत पार पडली. नेहाचे वडील शशिकांत हे एका छोट्याशा खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई सविताला नेहासाठी घरीच थांबावे लागते. नेहाला एक लहान बहीणही आहे. अपघातात नेहाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने तिच्यावर आत्तापर्यंत आठ ते दहा लाखांचा खर्च झाला आहे. अजूनही उपचार सुरूच आहे. जवळील सारे काही संपले आहे, खर्चाची आणि रोजच्या अन्नाची भ्रांत अशी काहीशी परिस्थिती आहे; परंतु नेहाच्या जिद्दीने आम्हालाच नवी ऊर्जा मिळते असे तिचे आई-वडील सांगतात. आयएएस होण्याचे नेहाचे स्वप्न आहे. (वार्ताहर)
तिच्या जिद्दीला सलाम
By admin | Updated: March 22, 2015 23:34 IST