सिडको : येथील महापालिका रुग्णालयाची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. सिडकोवासीयांचे आरोग्य अबाधित राखणारे रुग्णालयच रुग्णशय्येवर पडले असल्याची बाब प्रक र्षाने जाणवू लागल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व रुग्णालयाची दुरवस्था रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.महापालिकेच्या जुने सिडको येथील रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटून दुरवस्था झाली आहे. रुग्णांची गैरसोय, स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून संपूर्ण रुग्णालयालाच घरघर लागल्याने शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व याबाबत त्वरित सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. यानंतर या रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरातील घाण, कचरा तसेच वाढलेले गाजर गवत साफ करण्यात आले. रुग्णालयाच्या खराब झालेल्या खोल्या स्वच्छ करण्यात आल्या. गरोदर मातांच्या तपासणीसाठी टेबलची व्यवस्था करण्यात आली. रुग्णांसाठी गोळ्या, औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच याठिकाणी पाण्याची टाकी साफसफाई करून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे असलेल्या शौचालयाचीही स्वच्छता करण्यात आली आहे. परंतु या तात्पुरत्या डागडुजीबरोबरच या संपूर्ण रुग्णालयाचीच इमारत नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
रुग्णालयाची दुरुस्ती सुरू
By admin | Updated: December 21, 2015 23:07 IST