येवला : आगीतून उठून फुफाट्यात या म्हणीच्या अगदी विरुद्ध अर्थाचा प्रत्यय तालुक्यातील पांजरवाडी येथील बाळू किसन गाडेकर यांना आला. आगीमुळे संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली असताना त्यांच्या मदतीला येवला तालुका तलाठी संघटना सरसावली आणि गाडेकर परिवाराला या संकटातून सावरण्याचे बळ मिळाले आहे.
तालुक्यातल्या पांजरवाडी गावात राहणाऱ्या बाळू गाडेकर यांच्या घराला १५ जुलै रोजी आग लागली आणि काही क्षणात सगळा संसार होत्याचा नव्हता झाला. या घटनेची माहिती येवला तालुका तलाठी संघटना यांना समजली. तहसीलदार व संघटनेतील सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत १३ हजार ५०० रुपये रोख रकमेची मदत तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते गाडेकर कुटुंबीयांना प्रदान केली. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, तलाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, कमलेश पाटील, विशाल पाटील, संदीप काकड, अश्विनी भोसले आदींसह तलाठी कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
----------------
आपुलकीची भावना वाढीस
तलाठी संघटनेकडून संकटकाळात मिळालेली मदत गाडेकर कुटुंबासाठी मोलाची ठरली आणि तातडीने हव्या असलेल्या घरगुती वस्तू घेणे त्यांना शक्य झाले. तलाठी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि जनता यांच्यात एकमेकांविषयी आपुलकीची भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन तहसीलदार हिले यांनी यावेळी बोलताना केले.
-----------------------
येवला तालुक्यातील आपदग्रस्त बाळू गाडेकर कुटुंबाला तलाठी संघटनेच्या वतीने आर्थिक मदत देताना तहसीलदार प्रमोद हिले. समवेत निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगळे व संघटना पदाधिकारी. (२१ येवला १)
210721\21nsk_22_21072021_13.jpg
२१ येवला १