घोटी : कुर्ला येथे लोकलने धडक दिलेल्या अपघातात ठार झालेल्या ‘त्या’ चारही गॅँगमन मजूर युवकांच्या कुटुंबीयांना शासनाने आपत्कालीन निधीतून प्रत्येकी वीस हजार रुपये मंजूर केले असून या धनादेशांचे वाटप बुधवारी आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या चौघांच्या वारसांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्थसाहाय्य प्रकरणे मंजूर झाली असून त्याही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.गेल्या महिनाभरापूर्वी आमदार निर्मला गावित व पदाधिकाऱ्यांनी ‘त्या’ चौघांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच प्रत्येक कुटुंबीयांना तातडीचे आर्थिक साहाय्य केले. या कुटुंबीयांना घरकुलासोबतच निराधार योजनेचे लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार निर्मला गावित यांनी दिली होती.दरम्यान, शासनाकडून पाठपुरावा करून आमदार गावित यांनी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी वीस हजारांची मदत देण्यास भाग पाडले. तसेच या चौघांच्या वारसांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रकरणे मंजूर केली असून त्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून या लाभार्थींना तत्काळ दरमहा अनुदान देण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार प्राची कुडूसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन माळी, माजी सभापती कचरू पा. डुकरे, पं. स. सदस्य ठकूबाई सावंत, शंकर सावंत, भास्कर गुंजाळ, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब वालझाडे, प्रा. मनोहर घोडे, युवा नेते कमलाकर नाठे, माजी सभापती संपतराव काळे, नंदू काळे, चंद्रकांत पगारे, यशवंत सावंत, स्वीय सहायक योगेश चोथे श्रीमती कुदळे उपस्थित होते.यावेळी ‘त्या’ चौघांचे वारस मीराबाई भाऊ वारे, सावित्रीबाई नाना सावंत, मंगळू भावडू पोकळे, बुधा काळू भले यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.या कुटुंबांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत तसेच गेल्या महिन्यात घोटीतील अपघातात ठार झालेले माजी सरपंच स्व. राजेंद्र माळचे व सामाजिक कार्यकर्ते पै. साजीद तांबोळी तसेच बु. दीपक डोंगरदिवे यांच्या वारसांनाही तातडीने शासनाकडून आर्थिक मदत व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत आमदार गावित यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या. (वार्ताहर)
अपघातग्रस्तांना मदत
By admin | Updated: March 23, 2016 23:26 IST