वाडिव-हे : वाडिव-हेजवळ गडगडसांगवी रस्त्यावर गुरुवारी (दि.२७) सकाळी दहा वाजेच्या सुमारास लष्कराच्या सरावाचा तोफगोळा पडल्याने एका शेतकऱ्याची गाय ठार झाली आहे. तोफगोळ्याचे छर्रे जवळील घरातही पत्रा फोडून आत पडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने या ठिकाणी मानवी जीवित हानी झाली नाही.सकाळी दहा वाजेच्या दरम्यान लष्करातील जवानांकडुन सरावादरम्यान एक गोळा वाडिव-हे गावाच्या पश्चिमेला गडगड सांगवी रस्त्यावरील सुभाष संतु मुर्तडक आणि संजय भिकाजी राव यांच्या घरांच्या मध्ये शंभर फुटावर पडला. यावेळी मोठा आवाज झाला. गोळा फुटून त्याचे छर्रे इतस्तत: विखुरले गेले. यावेळी संजय राव यांची जरसी गाय व इतर जनावरे घरासमोर बांधलेली होती. एक छर्रा जरसी गाईला लागल्याने गाय जागेवरच ठार झाली. मोठ्या आवाजाने घरांना हादरे बसून तडे गेले तर सुभाष मुर्तडक यांच्या घराचा पत्रा फोडून एक छर्रा घरात पडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने हा गोळा वाडिव-हे गावात पडला नाही अन्यथा मोठी हानी झाली असती. घटनेची माहिती मिळताच वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटनेची माहिती लष्करी अधिकाऱ्यांना कळविली आहे.
लष्कराच्या तोफगोळ्याने वाडिव-हेत गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:29 IST
परिसरात भितीचे वातावरण
लष्कराच्या तोफगोळ्याने वाडिव-हेत गाय ठार
ठळक मुद्देएक छर्रा जरसी गाईला लागल्याने गाय जागेवरच ठार झाली. मोठ्या आवाजाने घरांना हादरे बसून तडे गेले