वणी : गेल्या आठवड्यापासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाची प्रतीक्षा अखेर संपली असून, वणी व परिसरात बारा तासापेक्षा जास्त वेळ पाऊस मनमुराद बरसल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.शुक्रवारी मध्यरात्रीपासून पर्जन्यवृष्टीस प्रारंभ झाला. शनिवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर कमी अधिक असला तरी सातत्य कायम राहिल्याने शेती व्यवसायास संजीवनी मिळाली आहे.खरिपाच्या हंगामाबरोबर प्रमुख उत्पादन असणाऱ्या भातशेतीवर पावसाची वक्रदृष्टी पडल्याने प्रतिकूल परिणामाची भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच टमाटा लागवड खोळंबली होती. भुईमूग, तूर, उडीद, मूग, मका, सोयाबीन या पिकांचे भवितव्य अधांतरी असताना पर्जन्यराजाने जोरदार हजेरी लावून शेतव्यवसायावरील संकट टाळल्याने शेतकऱ्यांच्या प्रार्थनेस यश आले आहे.दरम्यान, पावसाच्या हजेरीमुळे प्लॅस्टिक कागद व ताडपत्री खरेदी करणाऱ्यांनी दुकानात गर्दी केल्याने थंड पडलेल्या व्यावसायिक उलाढालीला तेजी आली आहे. शेतकरीवर्गाला पेरणीयोग्य पोषक पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)