लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच दिवसांनंतर रविवारी (दि.११) शहरात दुपारी चार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तासात शहरातील हवामान केंद्रात २६ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली.चार दिवसांनंतर उन्हाळी सुटी संपणार असून, शाळांची पहिली घंटा वाजणार आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ रविवारच्या सुटीच्या मुहूर्तावर गजबजली होती. मेनरोड, शालिमार, एम.जी.रोड, आदि परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याबरोबरच रमजान पर्वदेखील दुसऱ्या टप्प्यात आल्यामुळे मुस्लीम बांधवांनीही खरेदीसाठी बाजारपेठेकडे पावले फिरविल्याचे चित्र होते. दुपारी आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारी सकाळपासून वाऱ्याचा वेग मंदावला होता. तसेच शहरात ढगाळ हवामान असल्यामुळे नाशिककरांना उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजता पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. सातपूर, मखमलाबाद, गंगापूर या भागात जोरदार पाऊस बरसला.गटारींचे पाणी रस्त्यावरशहरात पावसाला सुरुवात झाली असली तरी महापालिकेकडून अद्याप पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली नसल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भूमिगत गटारी तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. एम.जी. रोडवरील रेडक्रॉस सिग्नलवर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर बोधलेनगर येथेही पाणी साचले.
शहर परिसरात जोरदार पाऊस
By admin | Updated: June 12, 2017 01:00 IST