नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचा कार्यकाल ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिने अगोदरच निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाळ संपण्यास अद्याप ११ महिन्यांचा कालावधी असताना या पदासाठीची निवड प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या जागेवर नवीन कुलसचिव निवडण्यासाठी विद्यापीठाने मागील आठवड्यात जाहिरात काढली आहे. त्यानुसार पाच वर्षांच्या कुलसचिव पदासाठी इच्छुकांनी ७ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर परीक्षा विभागाचे प्रमुख परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाल एप्रिल २०२३ मध्ये संपणार आहे. मात्र, त्यांना मागच्या वर्षातच पदोन्नती मिळालेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवरही विद्यापीठाने निवड प्रक्रिया पूर्ण केली असून, कर्नाटकातील बीदर येथील डॉ. संतोष क्षीरसागर यांची परीक्षा नियंत्रक पदासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र डॉ. अजित पाठक हे राज्य शासनाचे एमपीएससीद्वारे नियुक्त अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना राज्यशासन कार्यभार मुक्त करून नवीन जागेवर पदस्थापन देत नाही, तोपर्यंत नवीन परीक्षा नियंत्रक डॉ. संतोष क्षीरसागर पदभार स्वीकारण्याविषयी अस्पष्टता आहे. दरम्यान, डॉ. अजित पाठक यांना मेअखेपर्यंत विद्यापीठ प्रशासन आणि आणि शासनाकडूनही कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, असे झाल्यास पुढच्या महिन्यात डॉ. संतोष क्षीरसागर परीक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.