त्र्यंबकेश्वर : श्री संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक दिंड्यांचे आगमन होऊ लागले असून, पौष वद्य दशमीला सायंकाळपर्यंत सर्वच दिंंड्या येतील. यावेळी सुमारे ५ ते ६ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास राज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे.यात्रेनिमित्त शहर गजबजले असून, भाविक व वारकऱ्यांनी शहरात गर्दी केली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर-घोटी मार्ग, हरसूल-अंबोली, जव्हार रस्त्याने अनेक दिंड्या येत आहेत. मुखी हरिनाम घेत उन्हाच्या झळांनी तहानभूक विसरून वारकरी त्र्यंबकच्या दिशेने येत आहेत. प्रत्येक दिंडीला ध्वनिक्षेपक बसविण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झाले आहे. त्यामुळे शहर दुमदुमून गेले आहे. पौष वद्य एकादशीला निवृत्तिनाथांच्या रथाची स्वारी चांदीच्या रथात दिमाखात काढण्यात येणार आहे, असे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंतराव गोसावी, पंडितराव कोल्हे, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे यांनी दिली. लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 22:19 IST