पंचवटी : ओम नम: शिवाय, हर हर महादेव असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री कपालेश्वर महादेव मंदिरासह परिसरातील शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. यंदा महाशिवरात्र व प्रदोष असा दुग्धशर्करा योग आल्याने भाविकांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून येत होता. दर्शनासाठी येणारे भाविक करीत असलेल्या महादेवाच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भल्या पहाटेपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त नारोशंकर, श्री सिद्धेश्वर मंदिर, मखमलाबादरोड उदय कॉलनीतील शिवगुणेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कपालेश्वर मंदिरात पहाटे गुरवांच्या उपस्थितीत महादेवाचे पूजन व महाआरती करण्यात आली. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा पश्चिम दरवाजाने प्रवेश दिला जाऊन उत्तर व दक्षिण दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली होती.
हर हर महादेव; बम बम भोले
By admin | Updated: February 25, 2017 00:38 IST