गोकुळ सोनवणे सातपूरमहापालिका निवडणुकीत सातपूर विभागात भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित मात्र बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे प्रभाग सभापतिपद सत्ता सहजासहजी मिळणे अवघड जाणार आहे. पक्षीय बलाबल पाहता अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेच्या हातात पुढील पाच वर्षे सभापतिपदाचा रिमोट राहणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागात प्रथमच भाजपाला सर्वाधिक म्हणजेच नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेने आठ जागा जिंकल्या आहेत. मनसेला दोन जागांवर आणि रिपाइंला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यात रिपाइंने शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. रिपाइंने सेनेला साथ दिल्याने भाजपा आणि शिवसेनेचे पक्षीय बलाबल सारखे झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाला मनसेचा पाठिंबा मिळेल त्याच पक्षाचा सभापती होणार आहे. म्हणजेच सत्तेची चावी मनसेच्याच हाती राहणार आहे. मनसेने ठरविले तर सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला प्रभाग सभापतिपदापासून लांब ठेवू शकते. त्याबदल्यात मनसे प्रभाग सभापतिपद पदरात पाडून घेऊ शकते. असे झाल्यास भाजपाला विरोधात बसण्याची वेळ येणार आहे. (वार्ताहर)
प्रभाग सभापतिपदाचा रिमोट मनसेच्या हाती
By admin | Updated: March 23, 2017 21:15 IST