गुरुजींची गर्दी, संसर्गाला वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:23 PM2020-11-20T21:23:41+5:302020-11-21T00:47:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : राज्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरवर शिक्षण विभागाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत असून, शिक्षकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पार उल्लंघन होऊन एकप्रकारे कोरोना संसर्गालाच वर्दी दिली जात आहे.

Guruji's crowd, uniform to the contagion | गुरुजींची गर्दी, संसर्गाला वर्दी

गुरुजींची गर्दी, संसर्गाला वर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : राज्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरवर शिक्षण विभागाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत असून, शिक्षकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पार उल्लंघन होऊन एकप्रकारे कोरोना संसर्गालाच वर्दी दिली जात आहे.
निफाड तालुक्यातील शिक्षकांच्या तपासणीसाठी योग्य नियोजन न केल्याने पिंपळगाव येथील कोविड सेंटरमध्ये शेकडो शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत निफाड येथील गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांच्याशी संपर्क साधला असता तपासणीसाठी नेमके शिक्षक किती हेच माहीत नसल्याने हा गोंधळ झाला असल्याचे सांगत विभागाच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडविले.

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने शिक्षकांना शाळेतून बोलावणे आले व कोविड चाचणी शासनाच्या कोविड सेंटरमध्ये करावी. अशी सूचना करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून हे निर्देश दिल्यानंतर कोविड सेंटरचे डॉ. चेतन काळे यांनी गटशिक्षणाधिकारी तुंगार यांना प्रतिदिवस २०० शिक्षकांना तपासणीसाठी पाठवण्याचे नियोजन सांगितले, मात्र कोणतेही नियोजन न केल्याने निफाड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक पिंपळगाव येथे चाचणीसाठी एकाच दिवशी आल्याने तिथे शेकडो शिक्षकांची गर्दी झाली. परिणामी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत शिक्षकांकडूनच नियमांचे उल्लंघन झाले. मग शाळा सुरू झाल्यावर नियमांचे पालन होईल काय, मुलांचे आरोग्य सुरक्षित राहील काय, असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.
.........................................................

चौकट.....
गर्दीमुळे वाढली संसर्गाची भीतीह्ण.....

चाचणी केंद्रावरील शिक्षकांच्या गर्दीमुळे संसर्गाची भीती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिली. सर्व शिक्षकांच्या चाचण्या २ ते ३ दिवसांत होणे अशक्य आहे. अनेक शिक्षक मूळ गावी सुट्टीसाठी असल्याने शिक्षण विभागाने शाळांना १५ दिवसांचा वेळ द्यावा आणि नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षकांनी कोठेही केलेल्या चाचणीचा अहवाल कोणत्याही हद्दीत ग्राह्य धरावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली.
---------------------------------------------
तपासणीसाठी आलेल्या शिक्षकांमध्येच वाद..
शिक्षकांची कोविड तपासणी करण्यासाठी निफाड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने गटशिक्षणाधिकारी तुंगार यांच्याकडे नियोजन कसे करावे याबाबत सूचना दिल्या; पण तुंगार यांनी याचे कोणतेही नियोजन न केल्याने शेकडो शिक्षकांनी शुक्रवारी कोविड सेंटरला गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे शिक्षकांकडूनच उल्लंघन झाले आणि रांगेत उभे राहण्यावरून शिक्षकांमध्येच बाचाबाची होत वाद झाले. त्यामुळे शिक्षकांच्या शिस्तीला गालबोट लागले.
----------------------------------------------
कोट.....
गुरुवारी २१० शिक्षकांचे स्वॅब घेतले, आम्हाला साडेबारा वाजेपर्यंत स्वॅब घेऊन ते नाशिकला पाठवावे लागतात. आम्ही गटशिक्षणाधिकारी तुंगार यांना रोज २०० शिक्षक पाठवा, असे सांगितले होते, इथे एकाच दिवशी गर्दी केल्याने उपलब्ध मनुष्यबळानुसार आम्हाला हे काम करताना मर्यादा येत आहेत.

- डॉ. चेतन काळे, कोविड सेंटरप्रमुख
------------------------------------------
निफाड तालुक्यात नववी ते बारावीचे किती शिक्षक आहेत हे सांगणे कठीण आहे. कोरोना तपासणीसाठी इयत्ता पाचवीचेसुद्धा शिक्षक जात आहेत. त्यामुळे कोविड सेंटरला गर्दी झाली आहे. शिक्षकांनी सहकार्य करावे व ज्या पद्धतीने नियोजन केले आहे त्यानुसार तपासणी करून घ्यावी.
- केशव तुंगार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, निफाड

Web Title: Guruji's crowd, uniform to the contagion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक