पंचवटी : रामकुंडातील कॉँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावर पालकमंत्री यांनी घूमजाव करीत प्रसारमाध्यमांवरच खापर फोडले. महंत ग्यानदास यांच्याशी चर्चा केली, असे विधान आपण केले नव्हते तर चर्चा करणार असल्याचे म्हटले होते, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. रामकुंडातील कॉँक्रिटीकरण काढून टाकण्यात यावे, असे विधान काही दिवसांपूर्वी महंत ग्यानदास यांनी केले होते. त्यामुळे ऐनवेळी इतके मोठे काम करणार कसे असा पेच जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला होता. या प्रकरणी पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आपण महंत ग्यानदास यांच्याशी चर्चा केली होती. आता कुंडातील काँक्रिटीकरण काढून टाकणे शक्य नसल्याचे व सिंहस्थानंतर पाहू असे महंत ग्यानदास यांना आपण सांगितले होते, असा दावा केला होता. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या विधानाविषयी महंत ग्यानदास यांना नंतर विचारले असता त्यांंनी पालकमंत्री खोटे बोलत असल्याचे सांगितले. पालकमंत्री माझ्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत, गेल्या काही दिवसांपासून आपली त्यांच्याशी भेट झालीच नसल्याचा खुलासा ग्यानदास यांनी केला. सदर बाब पालकमंत्र्यांना कळताच त्यांनी आज थेट महंत ग्यानदास यांना गाठले आणि आपण असे कोणतेही विधान केले नसल्याचा बचाव केला. आपण काँक्रीट प्रकरणावर महंतांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते, असे घूमजाव केले. पालकमंत्र्यांनी आपले विधान अचानक बदलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पालकमंत्र्यांनी केलेल्या घूमजाववरून सकाळी मकवाना यांच्या बंद खोलीत ग्यानदास यांनी पालकमंत्र्यांसह अन्य आमदार, तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)
पालकमंत्र्यांचे घूमजाव; ग्यानदासांकडे धाव
By admin | Updated: July 12, 2015 23:06 IST