उपनगर : मंगळवारी गोदावरीला आलेल्या पुरामुळे कुंभमेळा काळात बांधण्यात आलेल्या टाकळी संगम येथील पुलाचे लोखंडी संरक्षक पाइप वाहून गेल्याने पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या दोन्ही कठड्यावरील संपूर्ण लोखंडी पाइप तसेच काही पथदीपही वाहून गेल्याने रात्रीच्या सुमारास या पुलावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत या पुलाच्या कठड्याला कोणतेही संरक्षण नसताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीने धारण केलेल्या उग्र रूपामुळे आलेल्या महापुरात टाकळी संगम घाटासह घाटालगतच्या चक्रधर स्वामी पुलालाही गोदेच्या महापुराचा तडाखा बसल्याने चक्रधर स्वामी पुलाचे सर्व लोखंडी संरक्षक कठडे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तुटून पडले. तसेच संपूर्ण टाकळी संगम घाटच गोदेने कवेत घेतल्यामुळे घाटाचे मोठे नुकसान झाले आहे. घाटावरील सर्व पथदीपांचे खांब, घाटांवर बांधण्यात आलेला डांबरी रस्ता सर्व उखडून वाहून गेल्याने लाखो रुपये खर्चून कुंभमेळा काळात सुशोभीकरण करण्यात आलेल्या टाकळी संगम घाटाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. (वार्ताहर)
टाकळी पुलाचे संरक्षक कठडे गेले वाहून
By admin | Updated: August 4, 2016 02:10 IST