दरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात राज्यात कांदा ५० टक्क्यांच्या पुढे शिल्लक आहे. सर्वसाधारण एप्रिल व मे महिन्यात दक्षिणेकडील राज्यात कांद्याला मागणी असते.
नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांचे कामकाज गत महिन्यात सरासरी १० दिवस बंद राहिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला मागणी असल्याने पुरवठा सुरू राहिला. मात्र, आता व्यापाऱ्यांकडील संपुष्टात आलेला साठा व देशात मागणी वाढती असल्याने व्यापारी खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे दर स्थिर असल्याची स्थिती आहे. गत एप्रिल महिन्यात बाजारात होणाऱ्या लेट खरीप कांद्याची सध्या आवक मंदावली आहे, तर उन्हाळ कांद्याची आवक वाढती असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांना कांदा साठवणूक व कांदा उपलब्धतेचा अंदाज असल्याने खरेदी करून कोटा पूर्ण करण्याची त्यांची लगबग आहे.
कांदा भाव व भुसार मालातही तेजी येईल अशी बाजार वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सध्या जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्याचा विचार लोकप्रतिनिधींकडून सुरु असल्याबद्दल शेतकरी बांधवांत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रब्बी हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहे. पावसाळ्यात खते, बियाणे आदींसाठी शेतीभांडवल उभे करणे गरजेचे आहे. अशा वेळी कांदा व शेतीमालाच्या लिलावात येणारे पैसे उपयोगी पडतात. परंतु कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवल्यास पुढील हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल. परिणामी आधीच कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडू शकेल, असाही मतप्रवाह आहे. विविध कारणांनी बाजार समित्या सतत बंद असतात. त्याच्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे गर्दी वाढते. उलट बाजार सतत चालू राहिल्याने गर्दी विभागली जाऊन संसर्गाचा धोका टळेल. त्यामुळे बाजार बंदचा निर्णय आत्मघातकी ठरून कोरोना संसर्गास निमंत्रण देणारा ठरेल, असे शेतकरी बांधवांना वाटत आहे.