जायखेडा : जम्मूतील बारामुल्ला येथे तीन दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झालेले भारतीय सैन्य दलातील जवान संदीप संतोष ह्याळीज यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आखतवाडे (ता. बागलाण) या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.आखतवाडेकरांसह बागलाण तालुक्यातील आणि कसमादे परिसरातील नागरिकांनी यावेळी आखतवाडे येथे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली. संदीप यांचा पाच वर्षाचा मुलगा पीयूष याने अग्निडाग दिला. यावेळी वातावरण अगदी भावुक झाल्याने उपस्थितांसह आबालवृद्धांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.तीन दिवसांपूर्वी संदीप ह्याळीज यांचा जम्मूतल्या बारामुल्ला येथे अकस्मात मृत्यू झाल्याचे सैन्य दलाच्या वतीने आखतवाडे येथे त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले होते. मात्र जम्मूतल्या खराब हवामानामुळे त्यांचे पार्थिव घरी आणण्यास विलंब झाला. रविवारी (दि.२२) रोजी त्यांचे पार्थिव जम्मूहून विमानाने मुंबई येथे व तेथून आज सकाळी शासकीय वाहनातून त्यांच्या मूळ गावी पार्थिव आणण्यात येऊन सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. सुभेदार पवार यांच्यासह आर्टिलरी सेंटर देवळाली येथील ज्युनियर कमांडिंग आॅफिसर नरेंद्र कुमार, लान्सनायक राजेश रोकडे, गणेश सोमवंशी आदिंसह सैन्य दलाच्या जवळपास पंधरा जणांच्या पथकाने ह्याळीज यांना सैन्य दलाच्या वतीने मानवंदना दिली. बागलाणचे प्रांताधिकारी संजय बागडे, तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर आदिंसह जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, माजी आमदार दिलीप बोरसे व अन्य मांन्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून ह्याळीज यांना श्रद्धांजली वाहिली.दरम्यान, संदीप यांच्या पार्थिवासोबत थेट जम्मूहून आखतवाडे येथे आलेल्या सैन्य दलातील अधिकाऱ्यांनीही त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात असमर्थता दर्शविली. शवविच्छेदन अहवाल अजून प्राप्त झाला नसून तो प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे जम्मूहून आलेल्या सुभेदार जी.आर. पवार यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)जवान संदीप ह्याळीज यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहताना प्रांत अधिकारी संजय बागडे व तहसीलदार अश्विनकुमार पोतदार.
संदीप ह्याळीज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Updated: November 23, 2015 23:36 IST