नवतंत्रज्ञानाव्दारे मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:32+5:302021-07-26T04:14:32+5:30

नाशिक : कोविडच्या सावटातही पुरस्काराची परंपरा अखंड ठेवण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा उपयोग कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. माधव गाडगीळ, सई परांजपे, श्रीगौरी ...

Greetings of gratitude to dignitaries through new technology! | नवतंत्रज्ञानाव्दारे मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार !

नवतंत्रज्ञानाव्दारे मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार !

Next

नाशिक : कोविडच्या सावटातही पुरस्काराची परंपरा अखंड ठेवण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा उपयोग कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. माधव गाडगीळ, सई परांजपे, श्रीगौरी सावंत, भगवान रामपुरे, दर्शना जव्हेरी, काका पवार यांना मानाचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना विज्ञान प्रसार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना चित्रपटांतील योगदानासाठी, श्रीगौरी सावंत यांना लोकसेवेसाठी, शिल्पकार भगवान रामपुरे यांना शिल्पकला क्षेत्रातील योगदानासाठी, दर्शना जव्हेरी यांनी मणिपुरी नृत्यातील योगदानासाठी तर काका पवार यांना क्रीडा प्रकारात कुस्तीतील योगदानासाठी प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गतवर्षीच्या गोदावरी गौरव पुरस्कारांचे ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले. गोदावरी गौरव २०२० पुरस्काराने सन्मानित सर्व गौरवमूर्तींनी अत्यंत कष्टाने आपापल्या क्षेत्रात अमूल्य योगदानाने समाज जीवन समृद्ध केले असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पुरस्कार वितरणानंतरच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कोविडच्या निर्बंधांमुळे आणि पुढील अनिश्चिततेमुळे सर्व गौरवमूर्तींनी ऑनलाइन हा पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात श्रीगौरी सावंत यांनी कुसुमाग्रजांच्या कणासारख्या काव्याने मला कार्य करण्याची स्फूर्ती दिल्याचे सांगितले. माझ्याबरोबर असलेले इतर सूर्याप्रमाणे तेजस्वी पुरस्कारार्थींसमवेत माझ्यासारख्या काजव्याचाही सन्मान खूप आनंददायी असल्याचे सांगितले. तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडरना स्वीकारण्याची ताकद समाजामध्ये आली पाहिजे या माझ्या कार्याला या पुरस्कारामुळे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. माधव गाडगीळ यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेतील निसर्गाच्या आविष्कारातून आनंदाची अनुभूती मिळाल्याचे सांगितले. शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले की शालेय जीवनात असताना मी नटसम्राट नाटकाच्या एका प्रवेशाच्या सादरीकरणात मुख्य भूमिका साकारल्याने कुसुमाग्रज आणि नटसम्राट नाटक माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याचे सांगितले. मणिपुरी नृत्यांगना गुरू दर्शना जव्हेरी यांनी माझ्या नृत्य क्षेत्रातील कार्याबद्दल झालेल्या सन्मानाबद्दल माझे गुरू, पालक आणि कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करते, असे नमूद केले. सई परांजपे यांनी कुसुमाग्रजांच्या मनाच्या देव्हाऱ्यात राम गणेश गडकरी यांना विशेष स्थान होते. त्यामुळे गडकरी यांच्या नावाने मिळालेला नाट्य परिषदेचा पुरस्काराबद्दल त्यांना विशेष अभिमान होता, तेवढाच आनंद आणि अभिमान मला कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिलेल्या या पुरस्काराने झाल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचे वस्ताद काका पवार यांनी पुरस्कारामुळे माझ्यासह कुस्ती या रांगड्या खेळाचा गौरव केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. यावेळी कोकण आणि कोल्हापूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या हानीबद्दल संवेदना प्रकट करण्यात आल्या. त्याचप्रमाणे कविवर्य वसंत बापट यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पुरस्काराथींचा परिचय ॲड. राजेंद्र डोखळे यांनी तर निवेदन आणि आभार शिल्पा देशमुख यांनी मानले.

इन्फो

मराठीच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेबाबत त्यांच्या कवितेत खूप वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे मराठी ही फाटक्या वस्त्रात बापुडवाणी होऊन मंत्रालयाबाहेर उभी असल्याचे सांगितले होते. आता तर ती जीर्ण फाटके लक्तरेही नाहीशी झाली असून मराठी भाषेच्या ऱ्हासाला आपण सर्व मराठी माणसेच जबाबदार असल्याचे कटुसत्य सई परांजपे यांनी सांगितले.

केवळ कुसुमाग्रजांचा जन्मदिनच नव्हे तर प्रत्येक दिन मराठी भाषा दिन साजरा करून आपण आजारी मराठीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयास करूया, असेही परांजपे यांनी नमूद केले.

फोटो - (पीएचजएल १०६)

ऑनलाइन पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे.

Web Title: Greetings of gratitude to dignitaries through new technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.