राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा नगरपरिषद व देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ट्रस्ट, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमास सकाळी ११ वाजता हजेरी लावतील. या कार्यक्रमानंतर दुपारी अडीच वाजता सुरगाणा तालुक्यातील भिंतघर (गुलाबगाव) येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करतील व तेथील गोशाळेस भेट देणार असून त्यानंतर नाशिककडे प्रयाण करतील. नाशिक शहरातील सातपूर येथील नॅशनल ब्लाइंड असोसिएशनच्या संशोधन व प्रशिक्षण निवास केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास सायंकाळी उपस्थित राहून राज्यपाल शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक घेण्यात येऊन राजशिष्टाचार व कायदा-सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, राज्यपालांना निवेदन व भेटण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असून, या दौऱ्यात ज्याही व्यक्ती अथवा संघटना यांना निवेदने द्यावयाची असतील, त्यांनी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे नावांची नोंदणी करून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पूर्वपरवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.