नाशिक : येथील सुकाणूसमितीच्या राज्यस्तरीय बैठकीत येत्या सोमवारी (दि.१२) राज्यातील तहसील कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनाद्वारे सरकारला मागण्या मान्य करण्याबाबतचा इशारा देण्याचा प्रयत्न असणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील रेल्वे, महामार्ग रोखण्याचा आंदोलन करत थेट निर्णय घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीला नाशिकमध्ये दुपारी सुरूवात झाली; मात्र या बैठकीत मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी बैठकीच्या व्यासपिठावर उपस्थित राजकिय पक्षांच्या नेत्यांच्या हजेरीवर आक्षेप घेतला. इनामदार यांनी जाहीरपणे माईकवर येत खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू हे व्यासपिठावर का? असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन यशस्वी करायचे असेल तर राजकिय नेत्यांना थारा देऊ नका अथवा सर्वच आंदोलनाला राजकिय रंग देऊन पुढाऱ्यांना सामील करा असे या महिलेने आपले मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. माझी सांगली जिल्ह्यात शेती असून माझा कुठलाही राजकिय पक्षासोबत संबंध नाही. मी मुंबई येथील रहिवासी असून एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असल्याच्या या महिलेने सांगितले. सुकाणू समितीमध्ये राजकिय नेत्यांचा सहभाग का ?असा प्रश्न या महिलेने बैठकीच्या सुरूवातीलाच उपस्थित केला.
दरम्यान, कॉँग्रेसेचे भाई जगताप यांनाही बैठकस्थळाकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न काही शेतक ऱ्यांनी यावेळी केला. सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात येणार असून सरकारने मागण्या मान्य न केल्यास शेतकरी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिंय्या आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनानंतरही सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर मंगळवारी राज्यातील महामार्ग, रेल्वेमार्ग रोखला जाणार असल्याचेही समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.